सोन्याचे बिस्कीट सांगून चोरट्यांकडून महिलेची ६० हजाराची फसवणूक

करमाळा : तुमच्या गळ्यात कमी सोने आहे, आम्ही तुम्हाला जास्त सोने देतो, तुम्ही तुमच्या गळ्यातील सोने द्या.. असे म्हणून व सोन्याचे सांगून पितळाचे बिस्कीट देऊन महिलेची ६० हजार रूपयाची फसवणूक केली आहे. हा प्रकार करमाळा शहरात दत्तपेठत १६ मे ला दुपारी साडेचार वाजता घडला आहे.

या प्रकरणी मांगी येथील सरूबाई मारूती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की १६ मे ला सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेनचौकातून दत्तपेठ येथे येत असताना एक माणूस मला भेटला. तो म्हणाला, आजी माझे सोन्याचे दागिणे पडले होते. एक माणूस उचलून घेऊन गेला आहे. आपण त्याच्याकडे जाऊ असे म्हणत होता.

त्याचवेळी दुसरी एक व्यक्ती आली व छातीवर मारून एक माणूस माझे १२ तोळे सोने घेऊन गेला आहे.. तुम्ही चला असे म्हणाला. त्यांना मदत करण्याच्या विचाराने मी त्या दोन इसमाबरोबर थोड्या अंतरावर चालत गेले. आडबाजुला बोळात गेलो असता ते दोघेजण म्हणाले, तुमच्या गळ्यात सोने कमी आहे. तुम्हाला आम्ही जास्त सोने देतो.. असे म्हणून त्यांच्या जवळील सोन्याचे बिस्कीट दिले व मी त्यांना माझ्या गळ्यातील सोन्याचे डोरले व कानातील फुल काढून दिले. त्यानंतर मी घरी आल्यावर ते बिस्कीट पाहिले असता ते पितळेचे बिस्कीट निघाले आहे. यावरून या दोन लोकांनी माझी ६० हजार रूपयाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



