करमाळ्यात मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

करमाळा (दि.२१) – एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या जेष्ठ कन्या कु. मुक्ताई मंगेश चिवटे हिच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहर व तालुक्यातील लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात करमाळा तालुका व शहरातील १०० पेक्षा अधिक मुलांची नोंदणी करण्यात आली. यापैकी ४७ मुलांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून, ज्या बालकांना पुढील शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांच्यावर मुंबई येथील प्रसिद्ध बालाजी हॉस्पिटल मध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संबंधित मुलांच्या प्रवासाची व शस्त्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी आयोजकांकडून घेण्यात आली आहे.

या शिबिरासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या टीमने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले असून, त्यांच्या समन्वयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


कार्यक्रमावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, उपतालुका प्रमुख डॉ. गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, सतीश रुपनवर, ओबीसी आघाडी अध्यक्ष अंकुशराव जाधव, युवासेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत राखुंडे, वैद्यकीय कक्ष प्रमुख दीपक पाटणे, नागेश शेंडगे व अजय पुराणिक यांची प्रमुख उपस्थिती होती.



