खून प्रकरणी शिक्षकाची निर्दोष मुक्तता -

खून प्रकरणी शिक्षकाची निर्दोष मुक्तता

0

करमाळा(दि.२७):  देवळाली (ता. करमाळा) येथील जंगलात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणात शिक्षक विश्वनाथ निवृत्ती मोगल यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

दि. २ मे २०१४ रोजी लमान बाबा मंदिराजवळ कोरड्या ओढ्यात एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या डोक्यात गंभीर जखम होती व मृतदेह अर्धवट जळालेला होता. वनमजुरांनी ही माहिती वरिष्ठ वनरक्षक गोरखनाथ माळी यांना दिली. यावरून करमाळा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला.

या दरम्यान, ४ मे २०१४ रोजी अक्षय शिंदे यांनी त्यांचे आजोबा विठ्ठल रामभाऊ टोणपे (वय ७०) दि. ३० एप्रिल २०१४ रोजी विश्वनाथ मोगल यांच्याकडे ठेवीचे पैसे घेण्यासाठी गेले असून परत न आल्याची तक्रार दिली. घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंमधून (चप्पल, चुण्याची डबी, करदोरा) मृत व्यक्ती टोणपे असल्याचे ओळखले गेले. टोणपे व मोगल यांच्यात आर्थिक वाद असल्याचेही सांगण्यात आले.

त्यानंतर आरोपी विश्वनाथ मोगल यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून हत्यार, मोटारसायकल व कपडे जप्त केले. तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. हसबनीस यांनी आरोपीविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा आरोपपत्र दाखल केला.

बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षाचे वकील ॲड. मिलिंद थोबडे व ॲड. निखिल पाटील यांनी खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असल्याचे दाखवले. मृत व्यक्तीचे वय ३५–४० वर्ष असल्याचे सांगितले गेले, तर टोणपे यांचे वय ७० होते, यामुळे पुराव्यात विसंगती असल्याचे अधोरेखित केले. मृतदेहाचा डीएनए तपास न केल्यानेही शंका उपस्थित झाली. तसेच आरोपी मोगल यांचा ज्ञानसागर पतसंस्थेशी कोणताही संबंध नव्हता, असे युक्तिवादात नमूद केले.

या सर्व युक्तिवादांचा विचार करून न्यायालयाने विश्वनाथ मोगल यांना निर्दोष मुक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!