कुर्डूवाडी उपविभागाला कायमस्वरूपी अधिकारी द्या- वकील संघाची मागणी

करमाळा (दि.२८): कुर्डूवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी उपलब्ध नाहीत, त्यामुळे नागरिकांची विशेषत: पालकांची मोठी गैर होत आहे .त्यामुळे या उपविभागासाठी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी करमाळा वकील संघाच्या वतीने वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र बरडे यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, कुर्डूवाडी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांची बदली झाली. त्यांची बदली झाल्यानंतर काही दिवस येथील अधिभार माळशिरसचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे होता. तर आता सांगोल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आहे. कायमस्वरुपी अधिकारी नसल्यामुळे या कार्यालयाला न्याय मिळत नाही. सध्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी आहे. त्यांना नॉन क्रिमिलियर तसेच जातीचे दाखले लागतात. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सह्या लागतात. अधिभार असल्यामुळे वेळेवर सह्या मिळत नाहीत. विद्यार्थांना वेळेत सह्या मिळल्या नाहीतर त्यांचे एका वर्षाचे नुकसान होवू शकते. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे खटले प्रलंबित आहेत ते खटले कायमस्वरूपी चालण्यासाठी कायमस्वरूपी उपविभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे असेही ॲड. बरडे यांनी सांगितले आहे.

दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील यांनी या प्रकरणी विशेष लक्ष देऊन रिक्त जागी कायमस्वरूपी उपविभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशीही मागणी वकील संघाने केली आहे.




