आमदार पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी

करमाळा(दि.२८): करमाळा मतदार संघात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे उभे पिक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. याची गंभीर दखल घेत आमदार नारायण आबा पाटील यांनी काळ दिवसभर नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पाटील यांनी शेटफळ, चिखलठाण, कुगाव या गावांमध्ये जाऊन केळी, डाळींब, उडीद, कांदा आदी पिकांची बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी त्यांच्यासमवेत तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी मधुकर मारकड, कृषी सहायक बाबुराव बेरे, नितीन रांजून, सुप्रिया शेलार, राहुल गव्हाणे, सचिन सरडे यांच्यासह पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे, आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, प्रवक्ते सुनील तळेकर, सरपंच विकास गलांडे आदी उपस्थित होते.


शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. अनेक ठिकाणी चिखल व रस्त्यांचा अभाव असतानाही आमदार पाटील यांनी ट्रॅक्टरमधून किंवा पायी जाऊन शेतात प्रत्यक्ष हजेरी लावत पाहणी केली.

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, करमाळा तालुक्यासह या मतदार संघाला जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावांतील अनेक शेतकऱ्यांचीही उभी पिके या अवकाळी पावसामुळे हातातून गेली आहेत. काही ठिकाणी काढणी केलेला कांदा रानात पडून असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. “जिथे मी जाऊ शकत नाही, तिथे कृषी व महसूल विभागाचे अधिकारी जाऊन पंचनामे करतील. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
आमदार पाटील यांच्या या तातडीच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.


