शेतीच्या वादातून शेतकऱ्याचा खून: अर्जुननगरमध्ये दुर्दैवी घटना, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा(दि.७): करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे शेतीतील सामायिक बांधावरील वादातून झालेल्या मारहाणीत एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत शेतकरी भुजंग सावळा रोकडे (वय ६५) रा. अर्जुननगर, ता. करमाळा यांच्यावर ७ जून रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास गट नं. ३६ मधील सामायिक बांधाजवळ हल्ला करण्यात आला. शेतीतील चारीमध्ये टाकलेल्या लिंबाच्या फांद्यांवरून वाद उफाळून आला. या वादातून तात्याबा बाबुराव रोकडे आणि नागनाथ ऊर्फ नागेश रोकडे (दोघेही रा. अर्जुननगर, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी भुजंग रोकडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तात्याबा रोकडे यांनी खिशातील धारदार चाकूने भुजंग रोकडे यांच्या छातीच्या डाव्या बाजूस गंभीर इजा केली.

गंभीर जखमी अवस्थेत भुजंग रोकडे यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृताचे चिरंजीव सतीश भुजंग रोकडे यांनी या घटनेची फिर्याद करमाळा पोलीस ठाण्यात दिली असून, तात्याबा बाबुराव रोकडे व नागनाथ ऊर्फ नागेश बाबुराव रोकडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.



