मराठा समाजाने घालून दिलेल्या विवाह आचारसंहितेनुसार केममधील मेघराज चव्हाण विवाहबद्ध

केम(संजय जाधव) : पुण्यातील हगवणे कुटुंबातील सुनेच्या आत्महत्येनंतर विवाह सोहळ्यातील अनाठायी खर्च आणि ताणतणाव यावर मराठा समाजात चिंतन सुरू झाले होते. त्यातून प्रेरणा घेत समाजाने अल्पखर्चीत, साध्या पद्धतीने विवाह करण्याची आचारसंहिता तयार केली. या विवाह आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा आदर्श केममधील (ता.करमाळा) चव्हाण परिवार व परळी वैजनाथमधील कापसे परिवाराने घालून दिला आहे.

दि. 8 जून रोजी लातूर येथे केम (ता. करमाळा) येथील श्री. सुनील चव्हाण व सौ. वर्षा चव्हाण यांचे चिरंजीव मेघराज आणि परळी वैजनाथ (जि. बीड) येथील श्री. प्रभाकर व सौ. छाया कापसे यांची कन्या दिपाली यांचा विवाह केवळ 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. या विवाहात कोणताही हुंडा, मानपान अथवा मोठ्या खर्चाचा अतिरेक करण्यात आलेला नव्हता.

वास्तविक हा साखरपुड्याचा सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या सोहळ्यास मराठा समाजातील पदाधिकारी – सुनील गायकवाड, धर्मराज शिंदे, आनंद शिंदे, अनिल काळे, किरण काळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विवाहपूर्व चर्चेतून दोन्ही कुटुंबांना समाजाच्या नव्या आचारसंहितेची माहिती दिली. समाजहिताचा विचार करून कुटुंबांनी एकमताने याच पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले.

सदर विवाहास विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंकुश नरडे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मराठा समाजातील तरुणांनी याच धर्तीवर विवाह करण्याचे आवाहन केले.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा गट) महिला आघाडी करमाळा तालुका अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण म्हणाल्या की, “माझ्या मुलाचा विवाह समाजाच्या आचारसंहितेनुसार पार पाडल्याचा मला आनंद आहे. याचा आदर्श घेऊन इतरांनीही असे विवाह करावेत.”

हा विवाह एक आदर्श म्हणून पाहिला जात असून समाजात सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल चव्हाण व कापसे कुटुंबांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा पद्धतीने पार पडणारे लातूर जिल्ह्यातील हे पहिलेच लग्न होते.


