“वटसावित्री पौर्णिमा : काळानुरूप नवा विचार…

पर्यावरणासाठी एक हिंदू संस्कृतीतील वटसावित्री पौर्णिमा हा उत्सव सुहासिनी स्त्रियांसाठी खास. पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत, “हाच पती सात जन्मी लाभावा” अशी प्रार्थना करत, वटवृक्षाची पूजा करणे, सात फेऱ्यांनी वडाला प्रदक्षिणा घालणे, हळदी-कुंकवाचा समारंभ, आणि आंबा फळ वाहणं ही एक धार्मिक परंपरा आहे.
ही परंपरा – सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या जपण्यासारखी आहे, यात शंका नाही. पण एक प्रश्न आजच्या काळात विचारायलाच हवा –
‘सर्वच पती सात जन्मांसाठी पात्र आहेत का?’
आजच्या काळात काही स्त्रियांना व्यसनी, मारहाणी करणारे, मानसिक त्रास देणारे, अगदी आत्महत्येला प्रवृत्त करणारे नवरे मिळतात. त्यांच्यासाठी पुन्हा त्याचाच सात जन्म मिळावा ही प्रार्थना कितपत योग्य आहे?
कदाचित आता वेळ आली आहे की श्रद्धा आणि विवेक यांच्यात संतुलन साधून या परंपरेचा आधुनिक पुनर्विचार करायला हवा.
वटसावित्रीचा नवा अर्थ – पर्यावरण पूजन हे समजले पाहिजे.
आजचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. निसर्गाचा समतोल बिघडतो आहे, आणि त्याचे परिणाम आपल्याला रोज जाणवतात – वाढते तापमान, ऑक्सिजनची कमतरता, प्रदूषण, दुष्काळ, पूर… कोरोना काळात ऑक्सिजनअभावी मृत्यूची ताजी आठवण आपल्याला अजूनही बोचते. मग वटसावित्रीच्या निमित्ताने दरवर्षी एक वटवृक्ष लावला, जो सात जन्मांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी उपयोगी पडतो, तर ही खरी श्रद्धा ठरेल नाही का?

वटवृक्ष, पिंपळ यांसारख्या झाडांमधून रात्रंदिवस प्राणवायू (ऑक्सिजन) उत्सर्जित होतो. हा वृक्ष सावित्रीसारखा जीवनदायी ठरतो. त्यामुळे जर देशातील लाखो महिला वर्षातून एकदा वडाच्या झाडाची पूजा करतात, तर त्यापैकी निम्म्या महिलांनीसुद्धा प्रत्यक्ष वटवृक्ष लावण्याचा संकल्प केला, तर हे एक राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय चळवळ ठरेल.
आमची वटपौर्णिमा – एक वृक्ष, एक व्रत!
आजच्या स्त्रीने श्रद्धा आणि शहाणपण यांचा संगम साधत पर्यावरण पूजेला वटसावित्री व्रताचे रूप दिले, तर भविष्यातील पिढ्यांसाठी ती देवता ठरेल.
“प्रत्येक वर्षी एक वटवृक्ष लावा,
प्रत्येक स्त्री एक सावित्री बनवा!”वड पूजताना एक झाड लावा, कुटुंबासाठी प्रार्थना करताना समाजासाठीही विचार करा. चला, वटसावित्रीच्या निमित्ताने
“परंपरेला नवा अर्थ देऊया, वृक्षलागवडीतून श्रद्धेला विज्ञानाची जोड देऊया!”
– दादासाहेब झिंजाडे, माजी मुख्याध्यापक, पोथरे, ता. करमाळा मो. 9423785233
