वीज कनेक्शनसाठी लाच मागणारा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

करमाळा (दि. 2): जेऊर वीज उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता (वर्ग-2) दिग्विजय आबासाहेब जाधव यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांनी शेती पंपाच्या कनेक्शनसाठी दहा हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास सहमती दर्शवल्यानंतर आज (सोमवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने त्यांच्यावर सापळा रचत ही कारवाई केली.

तक्रारदाराने आपल्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीसाठी शेतीपंपाच्या विद्युत कनेक्शनसाठी जेऊर वीज महावितरण कार्यालयात अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या अर्जाच्या पाठपुराव्यानंतर संशयित जाधव यांनी कनेक्शन देण्यासाठी विद्युत पोल उभारणीच्या मोबदल्यात लाच मागितल्याचे समोर आले.

त्यानंतर ACB पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. या कारवाईमध्ये एसीबीचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिरीष सोनवणे, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव आणि राहुल गायकवाड यांच्या पथकाने सहभाग घेतला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिक माहिती पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.