संत जनार्दन स्वामी महाराज पालखीचे केममध्ये उत्साहात स्वागत

केम(संजय जाधव) : दौलताबाद येथून प्रस्थान केलेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे केम ग्रामस्थांनी काल (दि. 1 जुलै) मंगळवारी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पालखी केम गावात दाखल होताच सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे यांनी पालखीला खांदा देऊन सोहळ्याचे औपचारिक स्वागत केले.

पालखीचे विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान होताच मार्गावर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संपूर्ण गाव भक्तिरसात न्हालेला दिसून आला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे केम गावात वैष्णवांचा मेळा जमलेला होता.

विठ्ठल मंदिरात पालखी दाखल झाल्यानंतर नियमानुसार श्रीची आरती करण्यात आली. आरतीनंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी महाप्रसाद (भोजनाची) व्यवस्था करण्यात आली होती.

यानंतर ह.भ.प. आनंदी महाराज यांचे कीर्तन पहाटे ९ ते ११ या वेळेत रंगले. कीर्तनानंतर पारंपरिक गावजागर कार्यक्रम झाला. पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करण्यात आला. सकाळी ७ वाजता योगेश पळसे यांच्या वतीने नाश्त्याची व्यवस्था केली होती. यानंतर सकाळी ८ वाजता पालखीने पुढील मुक्कामासाठी ग्रामस्थांचा निरोप घेत प्रस्थान केले.





