कंदर येथील घरफोडीचा छडा: सराईत चोरास अटक, १.५ लाखांचे दागिने हस्तगत -

कंदर येथील घरफोडीचा छडा: सराईत चोरास अटक, १.५ लाखांचे दागिने हस्तगत

0

करमाळा(दि.2) : करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका दिवसा घरफोडी प्रकरणाचा छडा लावत १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील पांडेगव्हाण येथील एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी अभिजीत जीवन सरडे (वय २७, रा. कंदर, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, दुपारी १२ ते २.३० दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला व सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान रामेश्वर जंगल्या भोसले (वय २५, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) याच्याकडे संशयाची सुई वळली. पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. कोठडीत चौकशीदरम्यान त्याच्याकडून १.५ लाख रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले व ठुशी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रामेश्वर भोसले हा पूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला असून त्याच्यावर करमाळा, कर्जत, गंगापुर, बिडकीन, राहुरी व आष्टी पोलीस ठाण्यांमध्ये एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, डकैतीच्या तयारीसह विविध गंभीर कलमांचा समावेश आहे.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील (करमाळा उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहायक पोलीस निरीक्षक गीरीजा म्हस्के, पो.उप.नि. प्रशांत मदने, पो.ह.वा. अजीत उबाळे, पो.ना. वैभव टेंगल, मनिष पवार, पो.शि. सोमनाथ गावडे, पोकॉ. योगेश येवले, मिलिंद दहिहांडे, अर्जुन गोसावी, अमोल रंदिल, रविराज गटकुळ यांच्यासह अंगुलीमुद्रा व सायबर विभागातील अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!