भक्तीमय वातावरणात केम मधून निघाली विद्यार्थ्यांची बालदिंडी

केम (संजय जाधव) – आषाढी वारीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, केम येथे भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठ्ठल-रुक्मिणी व विविध संतांच्या वेशात सादरीकरण करत संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण केले.

इयत्ता चौथीतील पृथ्वीसिंह दिक्षित याने विठ्ठलाचे रूप धारण केले होते तर आराध्या पवार हिने रुक्मिणीची भूमिका साकारली. वेदांत पळसे याने सुंदर असी संत तुकाराम महाराजांची वेषभूषा केली होती. गावात अनेक ठिकाणी महिलांनी पालखी आणि विठ्ठल-रुक्मिणीची पूजन करून स्वागत केले. प्रल्हाद शिंदे आणि मनोजकुमार शिंदे यांच्या वतीने बाल वारकऱ्यांना लेमन गोळी वाटप करण्यात आले.


बालदिंडीत गावातील भजनी मंडळांनी सहभाग घेत भक्तिगीते सादर केली. इ. पाचवीच्या सुंदर असी वारकरी पदावली सादर केली. विद्यार्थिनींनी पारंपरिक नृत्य व फुगड्या, भिंगरी खेळ सादर करत वातावरण आनंदमय केले. विद्यार्थ्यांनी मनोरा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. मुख्याध्यापिका मंदाकिनी तळेकर मॅडम आणि सहशिक्षक भालचंद्र गावडे प्रल्हाद गर्कळ लक्ष्मण शिंदे तुकाराम तळेकर जयश्री माने मॅडम यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब तळेकर व धर्मराज मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.


यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णासाहेब तळेकर , मल्हारी रोडगे, निलेश ओहोळ नवनाथ केंगार यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. बालदिंडीचे स्वागत खरेदी विक्री संघाचे सदस्य सागरराजे दोंड, अजितदादा तळेकर, उपसरपंच सागर कुर्डे, प्रहारचे अध्यक्ष संदीप तळेकर, सोसायटी चेअरमन आनंद शिंदे, बापू नेते तळेकर, श्रीहरी तळेकर यांनी केले. यावेळी तोफांची सलामी देण्यात आली.

या बालदिंडीचे यश हे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले. गावातील आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेत बालदिंडीचा आनंद लुटला. – भालचंद्र गावडे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, केम




