अपघातात आईचा मृत्यू; वडिलांविरोधात मुलाची पोलिसात तक्रार -

अपघातात आईचा मृत्यू; वडिलांविरोधात मुलाची पोलिसात तक्रार

0

करमाळा (ता.५ जुलै) – मोटारसायकल अपघातात आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार एका मुलाने स्वतःच्या वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात दिली असून, या घटनेने करमाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नदिन मुजावर (वय ३४, रा. पांडे, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नदिन यांचे वडील सुनिलाल बाबुलाल मुजावर व आई मदीना सुनिलाल मुजावर (वय ५८) हे २ जून २०२५ रोजी सकाळी आपल्या नातेवाईकांकडे जिक्री पाडळी (ता. जामखेड) येथे मोटारसायकलवरून गेले होते. दुपारी भेट आटोपून परत येताना, करमाळा-जामखेड रोडवर, पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्यात मोटारसायकल गेल्याने मदीना मुजावर यांचा तोल गेला व त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या

जखमी अवस्थेत त्यांना करमाळ्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बार्शी येथील खाजगी हॉस्पिटल व त्यानंतर १३ जून रोजी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, १६ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

फिर्यादी नदिन मुजावर यांनी असा आरोप केला आहे की, वडील सुनिलाल मुजावर यांनी मोटारसायकल निष्काळजीपणे, अतिवेगात व रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत चालवली, त्यामुळे हा अपघात घडून आईचा मृत्यू झाला. कुटुंबातील दुःखद प्रसंगामुळे विलंबाने का होईना, त्यांनी आता पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!