केम येथील नूतन विद्यालयात भक्तिमय दिंडी सोहळा

केम (संजय जाधव):आषाढी वारी निमित्त नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे पारंपरिक पद्धतीने भक्तिभावाने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘वारी आली आपल्या दारी’ या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली व चांगदेव महाराजांच्या भेटीला गेले या प्रसंगावर आधारित देखावा सादर केला. यामध्ये कुमार समर्थ कोळेकर (इ. ७ वी) यांनी ज्ञानेश्वर महाराजांची, सार्थक गाडे (७ वी) यांनी निवृत्तीनाथांची, शिवम भोसले (६ वी) यांनी सोपानदेवांची, सृष्टी बोराटे (५ वी) यांनी मुक्ताईची भूमिका साकारली. तसेच कृष्णा ननवरे (६ वी) यांनी चांगदेव, विश्वजीत गाडे (७ वी) यांनी वाघाची भूमिका साकारली. विठ्ठल-रुक्मिणीच्या भूमिकेत अनुक्रमे कादंबरी वासकर (५ वी) व कार्तिकी जाधव (५ वी) यांनी अभिनय केला.

दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी “हरिनामाचा गजर”, “ज्ञानोबा माऊली तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल विठ्ठला”, “हरी ओम विठ्ठला” अशा जयघोषांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. मुलींनी “रडू नको बाळा” ही गवळण अत्यंत सुरेल सादर केली.


दिंडीत समाजप्रबोधनपर घोषवाक्येही विद्यार्थ्यांनी दिली, जसे की —“हेल्मेट वापरा, जीव वाचवा”, “अक्षर कडे संकट तळे”, “एक मूल दोन झाडे”, “झाडे लावा झाडे जगवा”, “ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा” — यांमधून विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्री. आवताडे सर यांनी केले. या वेळी श्री. गायकवाड सर, श्री. पाटील सर, श्री. वनवे सर, श्री. देवकर सर, श्री. परदेशी सर, श्री. काळे सर, श्री. सलगर सर, श्री. शेंडगे सर, श्री. जाधव सर, श्री. शेळके सर, शुभम दास, केदार मॅडम, ऐश्वर्या पळसकर, तसेच मुख्याध्यापिका ताकमोगे मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्री. भाऊसाहेब बिचितकर व चेअरमन सुदर्शन बापू तळेकर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.


