जि.प. मलवडी शाळेतील सार्थक पालवे याची नवोदय विद्यालयासाठी निवड

केम(संजय जाधव): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सार्थक दादा पालवे याची जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे इयत्ता सहावीकरिता निवड झाली आहे. नवोदय प्रवेश परीक्षेत त्याला 100 पैकी 95 गुण मिळाले आहेत.

सार्थक हा मलवडी गावातून नवोदय विद्यालयात निवड होणारा पहिलाच विद्यार्थी ठरला असून, या उल्लेखनीय यशाबद्दल गावात आणि तालुक्यातून त्याचे विशेष अभिनंदन होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरले आहे.

सार्थकला शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका श्रीमती राणी सातव-देवकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच मुख्याध्यापिका रंजना पाटेकर, सुनिता रंदवे, शंकर ननवरे, उर्मिला खिळे व रेवणनाथ देवकर या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या यशासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती मलवडी, तालुका गटशिक्षणाधिकारी श्री. जयवंत नलवडे, विस्तार अधिकारी टकले साहेब, नितीन कदम साहेब, केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे साहेब आणि कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर साहेब यांनी शाळेचे व विद्यार्थ्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.




