टाळ-मृदूंगाच्या गजरात निघालेल्या विद्यार्थ्यांच्या दिंडीने केमनगरी दुमदूमली

केम (प्रतिनिधी – संजय जाधव): ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या उक्तीप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेचे प्रतिबिंब केम नगरीत दिसून आले. येथील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शिक्षणदिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हालून निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन श्री. महेश तळेकर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर,श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत दिंडी पूजनाने झाली.

‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. विठ्ठल-रुक्मिणीची पालखी, मानाचा घोडा, भक्तीमय गाणी, आणि टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीने संपूर्ण परिसरात आषाढी वारीचा भास निर्माण केला.

विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई, सावित्रीमाई फुले यांच्या व्यक्तिरेखा हुबेहूब साकारत प्रबोधनपर संदेश दिला. प्रत्येकाच्या कपाळावरच्या गोपीचंदमुळे वारकऱ्यांचे अस्तित्व जणू वास्तवात आले.
यात जवळपास ३५० ते ४०० विद्यार्थी व शिक्षकवृंद सहभागी झाले. केम गावातील रहिवासी, पालक, माता-भगिनी यांनी ठिकठिकाणी पालखीचे पूजन करत दिंडीचे स्वागत केले. वारकऱ्यांची फुगडी, भागवत धर्मध्वज, आणि पांडुरंगाच्या जयघोषाने दिंडीचा उत्साह द्विगुणित झाला

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. महेश तळेकर सर यांनी पालखीचे पूजन करून उपस्थितांना शेंगदाणा लाडूंचे वाटप केले. प्रशालेचा हा भक्तिपर्व साजरा करणारा दिंडी सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक सर्वत्र होत आहे.
