“बाल वारकऱ्यांनी रंगवली संत परंपरा – नामसाधना शाळेचा दिंडी सोहळा दिमाखात संपन्न”

करमाळा (दि. 8 जुलै) : करमाळा शहरातील श्री नामसाधना प्राथमिक विद्यालय (नगरपालिका सेंट्रल स्कूल मुलं नं. १) येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात ऐतिहासिक बालदिंडी सोहळा संपन्न झाला.

दिंडी सोहळ्याचे उद्घाटन करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी दिंडीची आरती करून सोहळ्याला प्रारंभ केला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन काळे, आनंद घोलप, भारती मेटकरी, रेश्मा गाडे, उज्वला ठाकूर, पत्रकार अण्णा काळे, रासपचे अंगद देवकते, दशरथ घोलप तसेच अनेक पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्याचे विशेष कौतुक केले.


या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विविध संतांच्या वेशातील बाल वारकऱ्यांची उपस्थिती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत गोरा कुंभार यांच्यासह अनेक संतांच्या रूपातील विद्यार्थ्यांची वेशभूषा डोळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक वाद्य, टाळकरी, अभंग गायन आणि सजवलेले रथ, घोडेस्वारांसह ही दिंडी संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहात फिरवण्यात आली.

रथामध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थी विराजमान होते, तर पालखी मिरवणूकही खास आकर्षण ठरली. ठिकठिकाणी शहरवासीयांनी पालखीचे स्वागत व पूजन करत हा भक्तिमय सोहळा अनुभवला.
सुमधुर अभंग गायिकेचा सहभागही विशेष ठरला. सुषमा उबाळे-केवडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकी सुरवसे हिने विठ्ठलाच्या अभंगांनी वातावरण भारावून टाकले.

दिंडीची वाहतूक व्यवस्था शाळेच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या वेशात समर्थपणे सांभाळली. शर्विल मस्कर, शिवांश लावंड, ध्रुव पुराणिक, पृथ्वीराज घोलप, सिद्धांत बुधवंत या विद्यार्थ्यांनी अनुशासनबद्ध भूमिका बजावली.

संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापिका सुनंदा जाधव – माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्या समवेत कोळी सर, शेरे सर, सुनीता उबाळे, सुनीता भैलुमे, धनश्री उपळेकर, वैशाली जगताप, आशा अभंगराव, मंगल गलांडे, आश्विनी ठाकरे, गौरव पलिकोंडवार सर यांचाही मोलाचा सहभाग होता. याशिवाय नगरपालिका मुली शाळा नंबर २ चे मुख्याध्यापक बलभीम शिंदे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही परिश्रम घेतले.
या भव्य सोहळ्याला प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे व केंद्र समन्वयक दयानंद चौधरी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शेकडो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यात सहभाग नोंदवत आपल्या संस्कृतीची समृद्ध परंपरा जपली.


