करमाळ्यात मोहरम उत्साहात आणि शांततेत पार पडला; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

करमाळा (दि. ८ जुलै) : करमाळा शहरात यंदाचा मोहरम सण उत्साहात आणि शांततेत पार पडला. 1 जुलैपासून सुरू झालेल्या विविध सवारींच्या प्रतिष्ठापना, मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

दिनांक 1 जुलै रोजी शहरातील नालसाहेब सवारी (मानाची सवारी), मोहीद्दीन तालीम, कुरेशी समाज, मदारी समाज, खाटीक गल्ली, माहुले, लालन साहेब, कुंभार समाज, फरीद मास्तर व दुधाट यांच्या सवारींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर,

- 2 जुलै रोजी मोहीद्दीन तालीम सवारीची मिरवणूक,
- 3 जुलै रोजी कुरेशी व मदारी समाजाच्या सवारीची मिरवणूक,
- 4 जुलै रोजी खाटीक गल्लीतील नालेहैदर सवारीची मिरवणूक,
- 5 जुलै रोजी कुंभार समाजाची अल्लाउद्दीन साहेब, रंभापूर येथील दुधाट सवारी आणि भवानी पेठेतील लालन साहेब सवारीची मिरवणूक काढण्यात आली.
- 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता शहरातील भुईकोट किल्ल्यातून मानाची नालसाहेब सवारीची शहरातील मुख्य रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
याच दिवशी कुंभार समाजाच्या सवारीची सवाद्य मिरवणूकही उत्साहात पार पडली. रात्री ताबुत व डोला यांचीही सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये चिवटे, जाधव, मुजावर, मुलाणी यांच्या डोल्यांचा सहभाग होता.

या सर्व कार्यक्रमांमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण शहरवासीयांनी उभे केले. शांततेत व सलोख्याच्या वातावरणात सण पार पडल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

सदर सण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोहरम कमिटीचे अध्यक्ष शौकत नालबंद, नगरसेवक अहमद कुरेशी, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, माजी नगरसेवक फारुक जमादार, संजय शिंदे, हाजी समीर बावा शेख, जाकीर वस्ताद, सोहेल पठाण वस्ताद, फारुक कुरेशी, जाफर घोडके, सारंग परदेशी, रामा ढाणे, पोपट माहुले आदींनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी योग्य बंदोबस्त ठेवून शांततेत सण पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.



