महिलेची पर्स पळवणारा आरोपी जेरबंद- दीड लाखांचे दागिने हस्तगत

करमाळा (दि. 12): करमाळा तालुक्यातील टाकळी चौक येथे घडलेल्या सोनं चोरीप्रकरणी करमाळा पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीवर दौंड पोलिस ठाण्यातही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती करमाळा पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

झिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले (रा. टाकळी, ता. करमाळा) असे अटकेत घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. खातगाव येथील आशा सोपान रणसिंग (वय ४८) या महिलेची १५ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास टाकळी चौक परिसरात पर्स पडली होती. पर्समध्ये १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. फिर्यादी या मोबाईलवर बोलत असताना रस्त्यावर पडलेली पर्स आरोपीने उचलून देण्याच्या बहाण्याने ती लंपास केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गाडी क्रमांकाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी विशेष पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी मोहिम हाती घेतली. आरोपी हा वारंवार आपले वास्तव्य बदलत असल्याने शोध कठीण झाला होता. मात्र पोलिसांनी मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार त्याला अटक करण्यात यश आले.

पोलिसांच्या तपासात आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीवर पूर्वी दौंड पोलिस ठाण्यातही दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलिस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलिस नाईक मनीष पवार, वैभव टेंगल, अमोल रंदिल, योगेश येवले, गणेश खोटे, समाधान भराटे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल व्येंकटेश मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



