म्हणे 100 खाटाचं रुग्णालय!

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाविषयी अनेक अनुभव कानावर येत असतात. परंतु परवाचा माझा स्वतःचा अनुभव हा अत्यंत वेदनादायक आणि विचार करायला लावणारा ठरला.
उत्तर प्रदेशातून काही मजूर कुटुंबे माझे शेतात राहत आहेत. त्यातील एक महिला, अंजली देशराज गौतम हिला बाळंतपणाचा त्रास सुरू झाल्याने मला फोन आला. तात्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण वेळ लागणार होता. त्यामुळे आमच्या स्टाफने तिला खाजगी वाहनातून करमाळा रुग्णालयात आणले.

दुपारी साधारण अडीच वाजता रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टर कदम यांनी पाहणी करून अवघ्या पाच मिनिटांत सांगितले की, “दोन बाळ आहेत, ती आडव्या स्थितीत आहेत,सिजर करावे लागेल, आमच्याकडे स्टाफ कमी आहे, आषाढी वारीचं काम सुरू आहे, सोलापूरला न्या..!” मी स्वतः जाऊन चौकशी केली, परंतु समाधानकारक उत्तर न देता ते एकाच गोष्टीवर ठाम होते – “सोलापूरला न्या!”

त्यानंतर पुन्हा 108 क्रमांकावर संपर्क साधला. त्या विभागातील सेवा मात्र खरोखर चांगली मिळाली. जेऊर येथून गाडी आली आणि माढ्यापर्यंत ती रुग्णाला घेऊन गेली. तेथून दुसरी गाडी तात्काळ मिळाली.सोलापूर सिव्हिल रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.
संध्याकाळी तिच्या पतीचा फोन आला की,तीला ८ क्रमांकाच्या वाॅर्ड मध्ये दाखल केले आहे. डॉक्टर प्रयत्न करत आहेत. आणि रात्री 10 वाजता पुन्हा फोन आला की, बाळंतीण सुरक्षित आहे, दोन्ही मुली सुखरूप जन्माला आल्या आहेत. त्यानंतर तीन दिवसांनी तिला करमाळ्याला परत आणण्यात आले.


या सर्व प्रक्रियेत एक गोष्ट खटकली करमाळ्यासारख्या ठिकाणी 100 खाटाचं असलेलं रुग्णालय असताना, बाळंतिणीला तातडीच्या वेळी सोलापूरला का पाठवावं लागलं? इथे सिजरची सोय आहे, डॉक्टर आहेत, यंत्रणा आहे – तरीसुद्धा रुग्णांमध्ये भीती पेरून, नातेवाईक घाबरवून, त्यांना पळवणं हे कुठल्या व्यवस्थेचं लक्षण?
मी स्वतः याआधी 3-4 डिलिव्हरी प्रकरणांसाठी गेलेलो आहे, पण अनेक वेळा रुग्णालयातील सेविका किंवा काही डॉक्टर सरळ सांगतात – “इथं नका ठेवू, येथे भुलतज्ञ नाही. डॉक्टर बाहेरून येतात, ते तीन-चार तासांनी येतील ,तुम्ही दुसरीकडे घेऊन जा.” अशा वेळी रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अधिकच घाबरतात. दिलासादायक शब्द ऐवजी, तेथील वातावरणच भयप्रद वाटतं.

आता प्रश्न असा आहे की, जर हीच महिला सोलापूरला जाऊन नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते, तर करमाळ्यात तीला सिजरची गरज का भासावी? की ही फक्त एक युक्ती आहे रुग्ण टाळण्याची?

“100 कोट्सचं रुग्णालय!” हे ऐकायला भारी वाटतं, पण त्यात अत्यावश्यक सुविधा नाहीत, डॉक्टर पूर्ण जबाबदारी घेत नाहीत, आणि रुग्ण घाबरवले जातात – तर ही केवळ इमारतच उरते, ‘सेवा’ नाही. या प्रकरणात एक सकारात्मक गोष्ट म्हणजे – 108 क्रमांकाची सेवा अतिशय तत्पर व तत्काळ होती. त्यांच्या गाड्या, संपर्क सुविधा आणि सहकार्य प्रशंसनीय होते. परंतु हे काम रुग्णालयाचं आहे, सेवाभाव हे तिथेच अपेक्षित असतो.

“म्हणे 100 कोट्स रुग्णालय!” पण…सेवा कुठे? जबाबदारी कुठे? माणुसकी कुठे?
मी यावरून एकच विनंती करतो – करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचा सखोल आढावा घेऊन, तेथील डॉक्टरांची जबाबदारी निश्चित केली जावी. लोकप्रतिनिधी नारायण आबा पाटील यांनी या विषयाकडे लक्ष द्यावं. या व्यवस्थेने लोकांच्या जीवाशी खेळू नये याची काळजी घ्यावी.
✍️डाॅ.ॲड. बाबूराव हिरडे, करमाळा.
मो.नं. 9423337480

