पत्रकार ते ॲडव्होकेट… व्हाया पाईप कारखाना!

“झाला अंधार तरी, मनात दिवा पेटलेला हवा । हार मानली जरी दुनिया ने, तरी माणूस झगडणारा हवा । यश कुठे झटकन मिळतं,जिद्द तिथेच यशाची हवा…॥”
आयुष्यामध्ये कोणतीही व्यक्ती कुठे आणि कशी पोहोचेल, हे कोणालाच सांगता येत नाही. मात्र जिद्द, स्वप्न पाहण्याची धग आणि त्या स्वप्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची तयारी असेल, तर कोणतीही वाट कठीण राहत नाही. करमाळा येथील पत्रकार विशाल (नाना) घोलप यांनी अशाच प्रेरणादायी प्रवासातून वकिलीचा मुक्काम गाठलेला आहे. वेगवेगळ्या व्यवसायांतून, संकटांतून आणि अडचणींतून वाट काढत त्यांनी पत्रकारितेपासून थेट कायद्याच्या व्यासपीठावर यशस्वी प्रवेश मिळवला आहे.

विशाल घोलप यांचे प्राथमिक शिक्षण करमाळा नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात, त्यानंतर त्यांनी सन २००५ मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून बी.ए. शिक्षण पूर्ण केलं.

पुढे त्यांची पहिली इच्छा होती वकिली क्षेत्रात प्रवेश करण्याची. मात्र काही परिचितांनी त्यांना सुचवलं की करमाळा नगरपालिकेत आरोग्य निरीक्षक पदाची जागा रिक्त आहे आणि ती आपल्याला सहज मिळू शकते, म्हणून त्यांनी एलएलबीचं शिक्षण सोडून आरोग्य निरीक्षक कोर्स केला. दुर्दैवाने प्रयत्न करूनही त्यांना संधी मिळाली नाही.यानंतर त्यांनी आपले मोठे बंधू संजयबापू घोलप यांच्यासोबत स्क्रॅपचा व्यवसाय सुरू केला, त्यानंतर पाईप उत्पादनाचा उद्योगही उभा केला.

व्यवसाय करत असतानाच शहरातील प्रश्नांवर आवाज उठवण्याची आणि सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातूनच त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला ‘दिव्य मराठी’ या दैनिकातून पत्रकार म्हणून काम सुरू केलं आणि २०१५ पासून आजतागायत त्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याचं आणि सर्वसामान्याना न्याय मिळवून देण्याचं काम ते करत आहेत.

यानंतर ‘करमाळा समाचार’ हे स्वतःचं वेब पोर्टल सुरू करून स्थानिक समस्या, शासकीय यंत्रणेची कामगिरी आणि अन्य सामाजिक बाबींवर ठामपणे मत मांडण्याचं काम सुरू केले आहे. विशेषतः एसटी महामंडळाच्या प्रश्नांवर त्यांनी केलेला पाठपुरावा एवढा प्रभावी होता की,महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हात जोडावे लागले, अशी अनेक उदाहरणे आहेत. इतकं सगळं करत असतानाच त्यांच्या मनात पुन्हा एकदा वकिलीचं स्वप्न जागं झालं आणि त्यांनी २०२२ मध्ये ठरवलं की आता कायद्याचं शिक्षण पूर्ण करायचं. नगर येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन २०२५ मध्ये त्यांनी एलएल.बी पूर्ण केलं आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलकडून सनदही प्राप्त केली.

त्यांचा विवाह २०१३ मध्ये करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष कै.डी. के. सावंत यांची नात आणि दत्तात्रय बेडकुते (वरकुटे) यांची कन्या तृप्ती यांच्याशी झाला. तृप्ती या स्वतः शिक्षिका असून सुरुवातीला चापडगाव येथे कार्यरत होत्या, सध्या करमाळा नगरपालिकेच्या शाळेत सेवा बजावत आहेत. त्यांना एक कन्या पुर्वा असून ती पाचव्या इयत्तेत शिकत आहे तर मुलगा पृथ्वीराज हा चौथीच्या वर्गात शिकत आहे.

विशाल घोलप यांचे ज्येष्ठ बंधू संजय बापू घोलप हे म.न.सेनेचे तालुकाप्रमुख आहेत तर बहिण सौ.अश्विनी संतोष गोडगे या देखील शिक्षिका असून त्यांचे मूळगाव सोगाव आहे पण सध्या मुंबईत कार्यरत आहेत. त्यांचे वडिल दादासाहेब घोलप करमाळा शहरातील एक प्रतिष्ठित, बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मातोश्री तारामती घोलप यांचे संस्कार आणि पाठबळ तसेच पत्नी सौ.तृप्ती यांची साथ यामुळेच विशाल यांनी आजवरची वाटचाल मोठ्या आत्मविश्वासाने पार केली आहे.
पत्रकारिता आणि कायदा ही दोन्ही क्षेत्रं लोकशाहीच्या मुल्यांची राखण करणारी आहेत. या दोन्ही क्षेत्रांच्या संगमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देणं, त्यांच्या समस्या सोडवण शक्य होणार आहे व हेच माझं ध्येय आहे. व्यवसायापेक्षा सामाजिक बांधिलकी जपणं आणि न्याय देणं यावरच माझी भिस्त राहणार आहे.
– ॲड. विशाल घोलप, करमाळा.मो.न 9404692440

