एमपीएससी परीक्षेतील यशाबद्दल आकाश नागणे यांचा सन्मान

केम (संजय जाधव): केम येथील रहिवासी आकाश भारत नागणे यांची एमपीएससी च्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये असिस्टंट इंजिनिअर (गॅझीटेड ऑफिसर) म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे चेअरमन श्री महेश तळेकर, संस्थेचे सचिव व राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनोद (मनोज) तळेकर, संस्थेचे सदस्य तथा श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर, श्री आकाश नागणे यांचे वडील भारत नागणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मानाचा फेटा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन श्री आकाश नागणे यांचा सन्मान करण्यात आला.
श्री आकाश नागणे यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून पदवी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून आर आर बी मध्ये ज्युनियर इंजिनिअर या पदावरील त्यांची नियुक्ती झालेली आहे तसेच महाडिस्कॉम (एम. एस. ई. डी. सी. एल.) मध्ये सुद्धा असिस्टंट इंजिनिअर या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे.
एकाच वेळी स्पर्धा परीक्षेतून तीन पदांवर उत्तीर्ण झाल्याबद्दल श्री आकाश नागणे यांचे केम आणि परिसरात कौतुक होत आहे.अत्यंत सामान्य परीस्थितीतून शिक्षण घेऊन नागणे यांनी स्पर्धा परीक्षेतील यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे.
सत्काराला उत्तर देताना श्री आकाश नागणे यांनी दोन्ही विद्यालयाचे भरभरून कौतुक केले या विद्यालयामध्ये श्री दत्तात्रय पवार गुरुजी, श्री नागनाथ तळेकर सर व इतर शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभल्यामुळेच आणि माझा याच प्राथमिक शाळेत पाया पक्का झालेला असल्यामुळे मी या यशाला गवसणी घालू शकल्याचे सांगून शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांच्या या यशामुळे प्रशालेतील सर्व विद्यार्थी प्रोत्साहित झाले आणि श्री नागणे यांच्या यशाचा हा झेंडा भविष्यात ही फडकवत ठेवणार आणि विद्यालयाची व केमची मान उंचवणार असल्याचा निर्धार केला