अवैध वाळू साठ्यावर पोलीसांचा धाडसी छापा – कंदर येथे १.४० लाखांचा साठा जप्त

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा (दि. १९) : उजनी जलाशयाच्या बाजुला कंदर (ता.करमाळा) येथे शब्बीर मौला मुलाणी या इसमाने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने विना परवाना वाळू उत्खनन करून सुमारे १ लाख ४० हजार रूपयांचा साठा तयार केल्याचे उघडकीस आले असून करमाळा पोलीसांनी महसुल विभागाच्या सहकार्याने कारवाई करत सदर अवैध वाळूचा साठा जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे अवैध वाळू साठ्याची माहिती समजल्यावर १९ जुलै रोजी सकाळी दहा वाजता पोलीस गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे, अलीम शेख, गणेश खोटे हे कंदर येथे पोहोचले. तेथे उजनी जलाशयाच्या काठावर मोठा वाळूचा ढिगारा आढळून आला. सदर वाळू कोणत्यातरी यांत्रिक बोटीच्या साहाय्याने उत्खनन केलेली असून, त्याबाबत आजुबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली असता शब्बीर मौला मुलाणी यांनीच हा साठा केल्याची माहिती मिळाली.

यानंतर महसुल विभागातील ग्राम महसुल अधिकारी गोरक्षनाथ ढोकणे व महसुल सेवक नागेश पवार यांना घटनास्थळी बोलावून पंचनाम करण्यात आला. सदर वाळू अंदाजे २० ब्रास किंमत प्रत्येकी ७ हजार रूपये असा एकूण १ लाख ४० हजार रूपयाचा आहे. हा साठा सरकारी परवाना व रॉयल्टीशिवाय बेकायदेशीररित्या साठवलेला असल्याने पर्यावरणाचा -हास होण्याची शक्यता लक्षात घेता संबंधिताविरूध्द भारतीय दंडसंहिता कलम ३०३ (२), ३२८ व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ९, १५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
