छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा करमाळा मराठा सेवा संघाकडून निषेध

करमाळा (दि.२१): लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेचा करमाळा तालुक्यातील मराठा सेवा संघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळात मोबाइलवर रमीचा डाव (पत्ते) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. अशातच, लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देत त्यांच्या समोर पत्ते उधळले, व कृषीमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. निवेदन देऊन बाहेर पडत असलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अचानक हल्ला झाला. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनाही यात बेदम मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील वायरल झाला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका होऊ लागली आहे.

या संदर्भात मराठा सेवा संघाच्या वतीने निषेध व्यक्त करताना तालुकाध्यक्ष सचिन काळे म्हणाले की, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर सारखे लोक जेव्हा अजितदादांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात तेव्हा या राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांचे हात कुठे गेलेले असतात? राज्याचे कृषिमंत्री विधानसभा सभागृहात रमी खेळतात. त्याविरोधात प्रतिकात्मक आंदोलन यांना चालत नाही. गरीब मराठा तरुणांना मारहाण करून मर्दानगी दाखवता का…? कुठल्याही प्रकारची चुकीची भाषा न करता ही जाणीवपूर्वक खोटे आरोप करण्याच काम राष्ट्रवादीचे लोक करत असल्याचे ते म्हणाले. विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीचा बदला येणाऱ्या काळात निश्चित घेतला जाईल असा ईशाराही त्यांनी दिला.




