करमाळ्यात बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त – एकावर गुन्हा दाखल

करमाळा (दि. २१ जुलै) : करमाळा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा साठवणूक व विक्री प्रकरणी सादीक युसूफभाई तांबोळी ( रा. कानाड गल्ली, करमाळा) या दुकानदारावर कारवाई करत, 5,600 रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.

दि. 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पोकॉ. मिलिंद दशरथ दहीहांडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तांबोळी किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानात नायलॉन मांजा साठवला जात असून विक्री केली जात आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन कारवाई केली. दुकानाची झडती घेतली असता, मोनो RTC कंपनीचे एकूण 16 नायलॉन मांजाचे रोल प्रत्येकी 350 रुपये प्रमाणे मिळून आले. सदर मुद्देमालाची किंमत सुमारे 5,600 रुपये इतकी असून हा मांजा जप्त केला आहे.

नायलॉन मांजा वापरामुळे पक्षी, गुरे व माणसांचे प्राण धोक्यात येतात, म्हणून राज्य शासनाने त्यावर पूर्णतः बंदी घातली आहे. असे असतानाही सादीक तांबोळी या दुकानदाराने विक्री व साठवणूक करून सार्वजनिक उपद्रव निर्माण केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाचे (BNS) कलम 223 व पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

करमाळा शहरातील तसेच तालुक्यातील सर्व दुकानदारांनी नायलॉन मांजाची विक्री करू नये. विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजा वापरापासून दूर ठेवावे. – पोलीस निरीक्षक रणजीत माने, करमाळा पोलीस स्टेशन


