जात पडताळणी कार्यालयात एजंट–अधिकाऱ्यांच्या संगनमताने लूट सुरु असल्याची तक्रार – कारवाईची मागणी

करमाळा (दि.२३) : जात पडताळणी कार्यालय, सोलापूर येथे एजंटांचा सुळसुळाट वाढला असून, एजंट व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांची लाच मागितली जात आहे, असा गंभीर आरोप सकल मराठा समाज संघटनेचेच्या वतीने करण्यात आला आहे.

या एजंटांमुळे सर्वसामान्य नागरिकांची प्रकरणे महिनोंमहिने प्रलंबित राहत असून, लाच दिल्याशिवाय प्रकरण पुढे सरकत नाहीत, असा प्रकार सातत्याने घडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर जात प्रमाणपत्र मिळत नसून, त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक भविष्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे.

या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदन देत तात्काळ उपाययोजना कराव्यात, प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत आणि दोषी एजंट व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली.

या मागणी बरोबरच पुढील मागण्या देखील या निवेदनात केल्या आहेत –
शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ या वर्षात इयत्ता १ ली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या अशा विद्यार्थ्यांची, की ज्यांच्या पालकांकडे कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा जातीचा वैध जातप्रमाणपत्राचा दाखला उपलब्ध आहे, त्यांची जात जनरल रजिस्टर क्रमांक १ मध्ये योग्यरित्या नोंदवावी. यासंदर्भात सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी व अनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा व इतर व्यवस्थापनाच्या शाळांचे प्रमुख, तसेच गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांना आवश्यक ती लेखी सूचना देण्यात याव्यात.

तसेच, सध्या इयत्ता २ री ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेले व ज्यांच्याकडे हिंदू कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा जातीचे वैध दाखले उपलब्ध आहेत, अशा विद्यार्थ्यांची जनरल रजिस्टरमधील जातीची नोंद दुरुस्त करण्यासाठीचे प्रस्ताव सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शिक्षणाधिकारी (प्राथमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कार्यालयास मंजुरीसाठी पाठवावेत. हे प्रस्ताव सर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितींनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी या नात्याने आपण द्यावेत.

हे निवेदन देताना मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, मराठा जिल्हा समन्वयक माऊली पवार, श्री. चापले, सकल मुस्लिम समाज अध्यक्ष जमीर सय्यद, सुजित बागल, सचिन पवार, श्री. मुलाणी आदीजण उपस्थित होते.

