प्रत्येक ग्रामपंचायतींने मानवाधिकारांचे उल्लंघन रोखण्यासाठी ‘ग्राम संरक्षण समिती’ स्थापन करावी – प्रमोद झिंजाडे

करमाळा(संदेश प्रतिनिधी): मानवाधिकारांचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रत्येक गावामध्ये ‘ग्राम संरक्षण समिती’ स्थापन करण्यात यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व करमाळा येथील महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना एका पत्राद्वारे केले आहे.

दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मानवाधिकार आयोग जरी या विषयावर काम करत असला, तरी गावपातळीवर जनजागृती आणि अंमलबजावणी करण्याचे मुख्य दायित्व स्थानिक प्रशासनाचे आणि ग्रामस्थांचे आहे. समाजामध्ये होणारे महिला व मुलींवरील अन्याय, दिव्यांग व्यक्तींवर होणारे भेदभाव, शैक्षणिक व आरोग्य सेवांपासून वंचितता, तसेच बालविवाह, बालकामगार, विधवा प्रथा, जातीभेद, मंदिरप्रवेश नाकारणे, पाणी भरण्यास मनाई करणे यांसारख्या अनिष्ट प्रथा हे सर्व प्रकार मानवाधिकारांचे सरळसरळ उल्लंघन आहेत, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर, येत्या १५ ऑगस्ट २०२५ च्या ग्रामसभेमध्ये ग्राम संरक्षण समिती स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग(sg.nhrc@nic.in/ dg-nhrc@nic.in,registrar-nhrc@nic.in.jst.nhrc@gov.in.js-nhrc@gov.in) आणि राज्य मानव अधिकार आयोग (registrar-mshrc@mah.gov.in/complaint- mshrc@mah.gov.in.) आणि महात्मा फुले समाजसेवा मंडळ (admin@mpssm.org) यांना पाठवावी, जेणेकरून या उपक्रमास अधिक बळकटी मिळेल.

हा उपक्रम राबविला तर गावोगावी मानवी हक्कांचे रक्षण होईल, भेदभाव व अन्यायाला आळा बसेल आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास झिंजाडे यांनी व्यक्त केला आहे.
या ईमेल व यांना पाठवून देऊन या असे आवाहन त्यांनी केले.


