ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु

केम (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा धोका गंभीर रूप धारण करत आहे. वैद्यकीय शिक्षण अथवा परवानगी नसतानाही हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करत असून त्यांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे.

तालुक्यातील जवळपास ११८ गावांमध्ये हे बोगस डॉक्टर बिनधास्तपणे कार्यरत आहेत. यातील अनेक बोगस डॉक्टर हे परराज्यातून आलेले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या ‘मदतीने’ त्यांचे जाळे विस्तारले जात आहे. काही प्रकरणांत तर बोगस डॉक्टर व अधिकाऱ्यांमधील साटेलोटे असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे कारवाई होण्याऐवजी हा प्रकार बळावतो आहे.

आरोग्य विभागाकडून कारवाईचे फक्त गाजर दाखवले जात असून प्रत्यक्षात कारवाई नजरेस पडत नाही. परिणामी सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरूच आहे.
एका बाजूला खासगी रुग्णालयातील भरमसाठ खर्च, दुसऱ्या बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधांचा अभाव – या परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग स्वस्त आणि लगेच इलाज करणाऱ्या या बोगस डॉक्टरांकडे वळतो. मात्र या डॉक्टरांकडे आरोग्यविषयक आवश्यक ज्ञान नसल्याने चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतात. शेवटी त्यांनाच महागड्या शहरातील उपचारासाठी धाव घ्यावी लागते.

बोगस डॉक्टर म्हणून फक्त परराज्यातील डॉक्टरांवर कारवाई केली जाते; मात्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी नसलेले, विविध थेरपींचे बिनपरवाना दवाखाने चालवणारे लोकही यात सामील आहेत. तसेच दवाखान्याच्या दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक असले तरी या नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे.


