ऑनलाइन रमीच्या व्यसनापायी ८० लाखांचे कर्ज - करमाळा तालुक्यातील युवकाची कहाणी -

ऑनलाइन रमीच्या व्यसनापायी
८० लाखांचे कर्ज – करमाळा तालुक्यातील युवकाची कहाणी

0

करमाळा (दि. २७):”ऑनलाइन गेमिंगपासून दूर राहा, त्यात मोठी आर्थिक जोखीम आहे,” असा इशारा वारंवार दिला जात असतानाही अनेक तरुण या आभासी जुगाराच्या आहारी जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. या व्यसनामुळे काही तरुण अक्षरशः रस्त्यावर आले असून त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

काही दिवसांपूर्वी कुर्डुवाडीतल्या बालाजी खरे या युवकाने ऑनलाइन जुगारात तब्बल ९० लाख रुपये, ६ एकर शेती आणि २ तोळे सोने गमावल्याची धक्कादायक बाब माध्यमांद्वारे समोर आली होती. याचबरोबर कुर्डुवाडी परिसरात सुमारे ७०० ते ८०० तरुण या व्यसनाच्या विळख्यात अडकले असल्याचेही उघड झाले आहे.

आता याच यादीत  करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावचा जय जाधव या २६ वर्षीय तरुणाचाही समावेश झाल्याचे समोर आले आहे. ABP माझा या वृत्तवाहिनीने जयची मुलाखत घेतली असून, त्यात त्याने स्वतःच्या अनुभवातून इतरांना इशारा दिला आहे. (बातमीच्या शेवट व्हिडीओ लिंक दिली आहे.)

जय हा रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होता. त्याने पिंपरी-चिंचवड येथे कमावलेले २३ लाख रुपये ऑनलाइन रम्मीमध्ये गमावले. त्यानंतर मित्रांकडून २० लाख रुपये उधार घेतले. एवढ्यावर न थांबता, त्याने करमाळ्यातील वडिलोपार्जित दीड एकर शेती आणि स्वतःची स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेवून आणखी २० लाखांचे कर्ज घेतले.

या सर्व व्यवहारांमुळे त्याच्या डोक्यावर एकूण ८४ लाख रुपयांचे कर्ज झाले. ही आर्थिक गर्ता इतकी खोल होती की, त्यातून सावरणे जवळपास अशक्य झाले. मात्र मोठ्या प्रयत्नांनंतर जय त्यातून कसाबसा बाहेर पडला. आता तो इतर तरुणांनी या खेळाच्या आहारी जाऊ नये, म्हणून धाडसाने पुढे येत स्वतःचे अनुभव मांडत आहे.

या घटनेतून आणि कुर्डुवाडीत घडलेल्या प्रकारातून, ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांचे गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम सर्वसामान्य जनतेसमोर येत आहेत. शासनाने यावर तातडीने कारवाई करावी, तसेच अशा व्यसनाधीनतेपासून तरुणांना वाचवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तरुणांनी या आभासी व्यसनापासून सावध राहावे आणि आपल्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन समाजातून करण्यात येत आहे.

व्हिडीओ लिंक : https://youtu.be/1QPEjRzU-YI?si=VrqTxxNaqB-2u8-D

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!