प्रगतशील शेतकरी धुळाभाऊ कोकरे यांना ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

करमाळा (दि.२७): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी राज्यस्तरीय जयंती उत्सवात करमाळा तालुक्यातील कुगाव येथील प्रगतशील शेतकरी धुळाभाऊ कोकरे यांना ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शनिवार दि. २६ जुलै रोजी पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक भवनात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

श्री.कोकरे हे उजनी बॅकवॉटर परिसरातील एक प्रगतशील शेतकरी आहेत. कुगाव येथे असलेल्या त्यांच्या ‘कोकरे आयलॅन्ड’ मध्ये त्यांनी राबविलेली आधुनिक शेती, AI तंत्रज्ञानाचा वापर, निर्यातक्षम उत्पादन, पर्यावरणपूरक शेती, आणि कृषी पर्यटनाच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.

शेती, पर्यटन आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम
धुळाभाऊ कोकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला एक नवे व शाश्वत रूप दिले आहे. त्यांनी AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामान भाकीत, पीक आरोग्य, खत नियोजन व कीड व्यवस्थापनास वैज्ञानिक आधार दिला आहे. १००% ड्रिप सिंचन प्रणाली, सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर, बहुपीक लागवड, निर्यातक्षम केळी उत्पादन आणि उसाचे विक्रमी उत्पादन यामुळे त्यांची शेती आज एक उत्पादनक्षम व अभ्यासात्मक मॉडेल झाली आहे. उजनी बॅकवॉटरच्या काठावर कृषी पर्यटनाची संकल्पना राबवत त्यांनी बोटींगसह पर्यटक व विद्यार्थ्यांसाठी शेतीत वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमातून रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि शेतीविषयी जागरूकता वाढीस लागली आहे.



