शाळेतील भांडणात विद्यार्थ्याचा मृत्यू!

केम(संजय जाधव): टेंभुर्णी येथील एका शाळेमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी स्वप्निल मन्मत शिंदे (वय १५), रा. कंदर (ता. करमाळा) याचा शाळेतील जिन्यात झालेल्या झटापटीदरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्याच शाळेतील एका १३ वर्षांच्या विद्यार्थ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेला विद्यार्थी देखील कंदर (ता. करमाळा) गावचा आहे.

स्वप्निलचे आजोबा अर्जुन भीमराव शिंदे यांनी याबाबत टेंभुर्णी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सदर घटना दुपारी तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घडली. शाळेच्या ब्रेकनंतर विद्यार्थी वर्गात जात असताना जिन्यावर स्वप्निल शिंदे व आरोपी विद्यार्थी यांच्यात धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर शाब्दिक भांडणात आणि नंतर मारामारीत झाले. यामध्ये दोघांनी एकमेकांना गच्चीला धरून चापटा मारल्या आणि जिन्याच्या पायऱ्यांपर्यंत झटापट करत गेले.

झटापटीदरम्यान आरोपी विद्यार्थी याने उजव्या हाताने स्वप्निल शिंदे याची मान दाबली, त्यामुळे स्वप्निल बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याची प्रकृती ढासळल्याने शिक्षकांनी तत्काळ त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पालक वर्गात तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित शाळेच्या प्रशासनाकडून देखील घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.



