श्रावणी सोमवारनिमित्त श्री उत्तरेश्वर देवस्थानचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

केम(संजय जाधव): सालाबादप्रमाणे यंदाही श्रावणी सोमवारनिमित्त श्री उत्तरेश्वर देवस्थानचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच श्रीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दात्यांच्या वतीने मसाले दूध वाटप करण्यात आले. या उपक्रमात संजय वाघमारे, कमल साखरे, चेतन साखरे आणि श्रीमंत बोगांणे सहभागी झाले होते. तसेच सायंकाळी राहुल कोरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिराच्या परंपरेनुसार श्री उत्तरेश्वर देवस्थानास फुलांनी सजवण्यात आले. मंदिराच्या गावाकडील बाजूस फुले अर्पण झाल्यानंतर “हर हर महादेव” च्या गजरात श्रींची मूर्ती सजविलेल्या पालखीत स्थानापन्न करण्यात आली आणि पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.

या सोहळ्यात हलगी, पुठ्ठा बँड, तुतारी, शिंगाडे आदी वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक निघाली. मंदिराच्या मुख्य दरवाज्याजवळ पालखी पोहोचल्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर ठरलेल्या छबीन मार्गावरून पालखीची प्रदक्षिणा सुरु झाली. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. संपूर्ण गाव “हर हर महादेव” च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

या सोहळ्यातील भाविकांसाठी ग्रामस्थांकडून चहाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदाच्या पालखी सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे गोसेवक परमेश्वर तळेकर यांचा ‘कपिला’ हा नंदी, जो विशेषतः भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.
सुमारे सहा तास चाललेल्या या भव्य पालखी मिरवणुकीत श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य, महंत जयंतगिरी महाराज आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यास सर्व समाजात मानाचे स्थान आहे.

पालखी मंदिरात परतल्यानंतर गुरव समाजातील सुवासिनींनी पूजन केले. त्यानंतर पालखी मंदिरात ठेवण्यात आली आणि श्रींची आरती पार पडली. अखेरीस महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले.

