कंदर येथे शुक्रवार पासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरवात

कंदर(संदीप कांबळे): श्रावण मासानिमित्त कंदर (ता. करमाळा) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवार, दिनांक १ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाची सुरुवात शुक्रवार सकाळी आठ वाजता ह.भ.प. श्रीकांत भोसले महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण, विना पूजन आणि ग्रंथ पूजनाने होईल.

दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ५ ते ६ काकडाआरती, ६ ते ७ अभिषेक, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ, ६ ते ७ प्रवचन, ७.३० ते ९.३० किर्तन व त्यानंतर हरीजागर, भजन, भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.

प्रवचनासाठी ह.भ.प. संदिपान सुतार, नारायण भोसले, मनोज शहा, सुग्रीव मिटकल, सदाशिव माने, पंडित रोमन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच कीर्तनासाठी ह.भ.प. मोहन बेलापूरकर, देविदास मस्के (नेवासा), संतोष पाटील (आळंदी), कल्याण काळे, शिवशाहीर मच्छिंद्र पैठणकर, रोहन पवार (बिजवडी) यांचे कीर्तन होणार आहे.

गुरुवार, दिनांक ७ रोजी दिंडी प्रदक्षिणा निघणार असून, सकाळी १० वाजता ह.भ.प. देविदास भोसले महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल. यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल आणि सप्ताहाची सांगता होईल.
रविवार, दिनांक ३ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत पोपट रणदिवे (झी टॉकीज फेम, देगाव), हरिभाऊ गाजरे (शेळवे) आणि दशरथ वराडे यांचा सोंगी आणि जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
कंदर व परिसरातील ग्रामस्थांनी या धार्मिक सप्ताहात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


