प्रा.अरुण चोपडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान – जल शुद्धीकरणाच्या दिशेने मोलाचे संशोधन

करमाळा(दि.1): प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, करमाळा येथील रसायनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री अरुण सुभाष चोपडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

“व्हिजिबल लाइट अॅक्टिव्ह अॅडव्हान्स्ड मेटल ऑक्साईड अॅन्ड देअर नॅनोकोम्पोझिट्स फॉर एन्व्हायर्नमेंटल रिमिडिएशन” या विषयावर त्यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यांनी आपल्या संशोधनामध्ये मुख्यतः दृश्यमान प्रकाश सक्रिय प्रगत मेटल ऑक्साईड व त्यांचे नॅनोसंयुगे यांचा पर्यावरणीय शुद्धीकरणासाठी वापर याचा सखोल अभ्यास केला असून, त्याचे परिणाम प्रदूषित जल व औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत उपयुक्त आणि मोलाचे ठरणारे आहेत.

प्रा. चोपडे यांचे एकूण सात शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. मुकुंद माळी, रसायनशास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. चोपडे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, मार्गदर्शक संचालक डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण देशमुख यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.



