हिसरे येथील राजेश पवार यांचा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव

करमाळा (दि. १ऑगस्ट): मुळचे हिसरे (ता. करमाळा) येथील व सध्या सातारा येथे कार्यरत असलेले राजेश रघुनाथ पवार यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले. हा गौरव ‘द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. पवार यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.मुख्य अग्निशामक अधिकारी श्री. शंकर पिसाळ व पोलीस निरीक्षक श्री. प्रल्हाद गीते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मा. राजेश पवार हे बहुजन चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते असून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर आधारित समाजकार्य करत आहेत. ते बामसेफ संयोजक व बहुजन समाज पार्टी सातारा या पदांवर कार्यरत आहेत. याआधीही त्यांना ‘समाजरत्न पुरस्कार 2019’ आणि ‘आदर्श सन्मान पुरस्कार 2022’ मिळाले आहेत.

या प्रसंगी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अन्सार शेख, राज्य उपाध्यक्ष प्रा. जीवन मोहिते, प्रांत अधिकारी सुधीर पाटील, बहुजन समाज पार्टीचे प्रेम मोरे, जिल्हा व तालुका स्तरावरील संघाचे पदाधिकारी व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कारानंतर हिसरे व सातारा मधील नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


