चारित्र्यावर संशय आणि हुंड्यासाठी छळाच्या आरोपातील पती व सासूला जामीन मंजूर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : चारित्र्यावर संशय घेतल्याने तसेच हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पती आणि सासूस सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ही घटना ११ जून २०२५ रोजी करमाळा येथे घडली होती. या घटनेत वैष्णवी प्रदीप माने (वय अंदाजे ३०) हिने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी पती प्रदीप भारत माने, सासू कमल भारत माने आणि सासरे भारत माने (सर्व रा. कानड गल्ली, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रदीप व कमल माने यांना करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात प्रमिला अंगद माने (रा. एसटी कॉलनी, धाराशिव) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
वैष्णवी व प्रदीप यांचे लग्न डिसेंबर २०१८ मध्ये झाले होते. लग्नानंतरच्या काही वर्षांतच त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची तक्रारीत माहिती देण्यात आली आहे. या वादांचे कारण चारित्र्यावर संशय घेणे आणि माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावणे असल्याचे सांगण्यात आले. या मानसिक त्रासामुळेच वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला.
प्रकरण सत्र न्यायालय, बार्शी येथे सुरू असताना आरोपींच्या वतीने ॲड. भारत कट्टे, ॲड. सुनील घोलप आणि ॲड. गणेश जगताप यांनी युक्तिवाद सादर केला. यानंतर न्यायालयाने दोघा आरोपींना जामीन मंजूर केला आहे.