केम येथून भगिरथ विद्युत लाईनच्या कामास सुरुवात
– उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीस चालना मिळणार

केम (संजय जाधव) : केम ते मलवडी रेल्वे लाईनपलीकडील वाड्या-वस्त्या तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र भगिरथ विद्युत लाईन मंजूर झाली असून, त्या कामाचा शुभारंभ दिनांक १ ऑगस्ट रोजी करण्यात आला.

या उद्घाटनप्रसंगी माजी सरपंच अजित तळेकर, सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे आणि सामाजिक कार्यकर्ते अतुलभाऊ पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून कामास सुरुवात करण्यात आली.

या कामात निमोणी मळा आणि इतर वाड्यांना भगिरथ योजनेतून सिंगल फेज लाईन उपलब्ध होणार असून, उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र लाईन टाकली जाणार आहे, अशी माहिती माजी सरपंच अजित तळेकर यांनी यावेळी दिली.

या योजनेसाठी माजी सरपंच अजित तळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात राहुल कोरे, श्रीहरी तळेकर, धनंजय नाईक नवरे, सतीश खानट, हरि तळेकर, धनंजय सोलापूरे यांचा समावेश होता. खासदार मोहिते पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधत कामास मंजुरी मिळवून दिली.

औद्योगिक वसाहतीस चालना
श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीस गेल्या २५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली वीज मिळाल्याने आता या परिसरात औद्योगिक प्रगतीला चालना मिळणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निर्णयाबद्दल कुंकू कारखानदार असोसिएशनच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे आभार मानण्यात आले. मुख्य प्रवर्तक मनोजकुमार सोलापूरे यांनी वसाहतीच्या भविष्यातील योजनांबाबत आशावाद व्यक्त केला.

शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
केम परिसरातील रेल्वे लाईनपलीकडील शेतकऱ्यांनी सिंगल लाईटच्या दीर्घकालीन समस्येचा कायमस्वरूपी निकाल लावल्यानं खासदार मोहिते पाटील व माजी सरपंच अजित तळेकर यांचे कौतुक केले आहे. प्रगतशील बागायतदार हरि तळेकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले
कामाच्या शुभारंभ प्रसंगी वायरमन श्री. कासले , समीर दादा तळेकर, माजी उपसरपंच नागनाथ तळेकर, कुंकू कारखानदार धनंजय सोलापूरे, गणेश तळेकर, राहुल रामदासी, प्रमोद धनवे, राजेंद्र काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

