क्षेम नगरी ते श्री क्षेत्र केम -

क्षेम नगरी ते श्री क्षेत्र केम

0
उत्तरेश्वर देवस्थान मंदिर

केम येथे श्री ऊत्तरेश्वराचे हेमाडपंथी प्राचीन मंदिर असून, येथे एक स्वयंभू शिवलिंग आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी येतात. पूर्वी या नगरीला “क्षेम नगरी” असे समजले जायचे.

पुढे या नगरीचे नाव “केम” असे पडले. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते की, उज्जैनमध्ये वास्तव्य असलेल्या चंद्रसेन राजाला संतती नसल्यामुळे तो मनोमन नाराज होत असे. पुढे त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. राजपुत्राचे नाव “क्षेम” ठेवण्यात आले. क्षेम हा कुशाग्र बुद्धीचा व सर्व शास्त्रात निपुण होता. पुढे त्याचा चक्रवर्ती राजाच्या कन्येशी विवाह झाला.

लग्नानंतर राजा महालात निघाला, तेवढ्यात क्षेम राजावर देवाने घात केला. त्याच्या संपूर्ण शरीरातून दुर्गंधी सुटू लागली, गहाण रक्त वाहू लागले. वैभवशाली शृंगार, फुलांची गादी – सर्व नष्ट झाले. क्षेम राजा आपल्या शरीराकडे पाहून एका ठिकाणी जाऊन रडू लागला.

राजकुमारीने क्षेम राजाचा शोध घेतला. एका मंदिरात क्षेमराजे दिसले. तिच्या प्रवेशानंतर दुर्गंधी जाणवली, आणि त्याच्या अंगातून गहाण रक्त वाहत होते. राजाने अनेक उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही. व्याधी अधिकच वाढत गेली.

एके दिवशी उज्जैनहून एक मुनीवर आले. ते त्रिकालदर्शी, ज्योतिषशास्त्राचे जाणकार होते. क्षेम राजाने त्यांना पत्नीसमवेत साष्टांग नमस्कार करून सर्व प्रकार सांगितला – “दिवसा शरीर ठीक असते, पण रात्री दुर्गंधी सुटते.”

हे ऐकून साधूंनी डोळे मिटून अंतरज्ञानाने उत्तर दिले :
“तू मागील जन्मी एका सावकाराचा पुत्र होतास. संपूर्ण गावाचे सूत्र तुझ्या हाती होते. त्याच नगरात एक पांथस्थ होता. लोकांच्या श्रमावर त्याची उपजीविका होती. त्याची पत्नी अत्यंत सुंदर होती. तू त्या स्त्रीवर अत्याचार करत तिला धनाचे आमिष दाखवले. तिने घरी जाऊन घटना पतीला सांगितली. त्यांच्या शापामुळे तुला हे भोग भोगावे लागत आहेत.”

“तुम्ही दोघे उज्जैन सोडून दक्षिणेकडे जा. दरम्यान दर मुक्काम करत प्रवास करा. एके ठिकाणी तुला कुंडाची प्रचिती येईल. तिथे सात लिंगांचे दर्शन होईल. ज्यादिवशी त्या कुंडात स्नान करशील, त्यादिवशी तू शापमुक्त होशील.”

साधूंनी सांगितल्याप्रमाणे ते दरकोस मुक्काम करत करमाळा येथे आले. त्यानंतर त्यांचा मुक्काम कमलई देवी येथे झाला. देवीने साक्षात दर्शन देऊन सांगितले : “तू माळवाडी (मलवडी)कडे जा. तिथे मोठे जंगल आहे. त्यात तुला कुंड दिसेल.”

क्षेम राजा मलवडी येथे आला. तेथे वस्ती करून राहत असताना त्याला दक्षिणेकडे मोठे जंगल दिसले. त्या जंगलात एका ठिकाणी त्याने झरा पाहिला. रात्र झाल्यामुळे त्याने झऱ्याचे पाणी स्पर्श करून प्यायले. तेवढ्यात चमत्कार झाला – त्याची व्याधी नष्ट झाली.

क्षेम राजाची व्याधी या कुंडातील पाण्याच्या स्पर्शाने  नाहिसी झाली. त्याला आता बारव म्हणतात.

त्याने सेवकाला बोलावून तो झरा उकरून काढला. पुन्हा स्नान केल्यावर तो शापमुक्त झाला. त्यानंतर त्याने आपल्या सैनिकांना त्या ठिकाणी – क्षेम नगरीत – स्थायिक केले. ह्याच क्षेम नगरीचे नाव पुढे “केम” पडले.

हा झरा उगमल्यानंतर त्यात सात शिवलिंग सापडली. ती शिवलिंगे म्हणजे –
ऊत्तरेश्वर, रामेश्वर, घुटकेश्वर, शंकरश्वर, दक्षिणेश्वर, केमेश्वर, मदनेश्वर, बसवेश्वर. ही सातही शिवलिंगे केम व परिसरात स्थापन झाली आहेत.

श्री उत्तरेश्वराचे शिवलिंग

क्षेम राजांच्या राणीला पार्वती मातेचे दर्शन झाले. राणीने पार्वती मातेच्या भाळी कुंकू लावले व अंजळीत भरले. पार्वती मातेने आशीर्वाद दिला की क्षेम नगरीला कुंकू निर्मिती होईल.

“ऊफाळले कुंकू, म्हणुनी भूमी रंगली;
कुंकवाच्या निर्मितीमुळे केम प्रसिद्ध झाले.”

संदर्भ : श्री ऊत्तरेश्वर महात्म्य
ग्रंथकर्ता : भास्करबुवा साकतकर

पुजारी कृष्णा गुरव, तात्या गुरव यांनी केलेले भाताचे लेपण

श्री ऊत्तरेश्वर देवस्थानास शासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे देवस्थानच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्राचीन मंदिर असून, श्रावण महिन्यात भाविक विविध ठिकाणांहून येथे येतात. भाविकांसाठी भक्तनिवासाची सोय करण्यात येणार आहे.

केम येथे मोठ्या प्रमाणात कुंकू निर्मिती केली जाते.

श्रावण महिन्यात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. भाविक अभिषेक करतात. काहीजण नवस फेडतात – काही भाताचे लेपन करतात, तर काही नारळाचे तोरण बांधतात. हे जागृत देवस्थान असल्याचे भाविकांना प्रचिती येते. श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी मोठ्या उत्साहात पालखी सोहळा निघतो. या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

✍️संजय जाधव, केम

संजय जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!