ऊत्तरेश्वर देवस्थान परिसरात चिखलामुळे भाविकांची गैरसोय

केम(संजय जाधव) – केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानच्या समोरील मैदानावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. यामुळे भाविकांत नाराजी व्यक्त होत आहे.

या देवस्थानला गावातून दोन रस्ते येतात – एक चौकातून तर दुसरा स्टेशन रोडमार्गे, केम ग्रामपंचायत जवळून. या दोन्ही मार्गांपैकी मंदिरासमोरील मैदानातून जाणाऱ्या रस्त्यावर चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे विशेषतः बाहेरगावाहून गाड्या घेऊन येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याशिवाय मंदिराशेजारी दशक्रिया विधी देखील पार पडतात, ज्यासाठी बाहेरगावचे लोक येतात. नर्सिंगपूर येथे कावळे नसल्याने अनेक दशक्रिया विधी ऊत्तरेश्वर देवस्थान परिसरातच पार पडतात. या वेळी भाविकांना व विधीसाठी आलेल्या मंडळींना चिखलातून गाडी चालवताना अक्षरशः ‘तारेवरची कसरत’ करावी लागत आहे.

भाविकांनी श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन पाण्याचा निचरा करून मैदानावर मुरुम टाकावा, अशी मागणी केली आहे.

“याच मैदानात दर रविवारी आठवडा बाजार भरतो आणि त्यावेळी ग्रामपंचायत आम्हा भाजी विक्रेत्यांकडून बाजारकर वसूल करते. आता येथे चिखल झाल्याने ग्रामपंचायतीने जबाबदारी घेत मुरूम टाकून मैदानाची दुरुस्ती करावी.”
– केमेश्वर सुरवसे, भाजी विक्रेते, केम


