सालसेसह पूर्व भागातील पाणी साठ्यांना जीवदान – शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण

करमाळा(दि. ११): आमदार नारायण पाटील यांच्या आदेशानुसार गेल्या महिन्यापासून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याचे आवर्तन सुरु असून यातून या भागातील तलाव, बंधारे, नाला बिल्डींग, गावतळी अशा पाणीसाठ्यांमध्ये पाणी साचू लागले आहे. गेल्या सहा वर्षांत प्रथमच सालसे तलावात देखील पाणी पोहोचले आहे असून सालसे सह पूर्व भागातील शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

यात वडशिवणे तलाव, नेरले तलाव, वरकुटे बंधारे यांसह सालसे तलावाचा समावेश आहे. वरकुटे, नेरले, घोटी, वडशिवणे, केम हद्दीतील चारी, निंभोरे, आळसुंदे परिसरातील बंधारे, साडे तसेच सालसे भागातील पाणी साठे भरले आहेत. काल (दि.१०) रविवारी सालसे-नेरले तलावातील उजनीच्या पाण्याचे पूजन जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी पूर्व भागातील उर्वरित गावांना देखील दहिगाव उपसा योजनेचे पाणी देण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, या योजनेपासून वंचित असलेल्या चाऱ्या व तलावांचा कायमस्वरूपी समावेश करण्याबाबत प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमास आदिनाथचे संचालक आबासाहेब अंबारे, सरपंच दादासो भांडवलकर, सरपंच सोमनाथ देवकाते, यांच्यासह सालसे,नेरले,वरकुटे, आळसुंदे येथील स्थानिक मान्यवर उपस्थित होते. आमदार नारायण पाटील यांच्या या कामाबद्दल परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.



