“जेऊरच्या रस्त्यांवर देशभक्तीचे रंग – 300 फूट तिरंगा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू”

करमाळा(दि.१४):जेऊर (ता. करमाळा) येथे आज 14 ऑगस्ट रोजी 300 फूट तिरंगा पदयात्रा उत्साहात पार पडली. तरुणाई व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात माजी सैनिक संघटनेचा विशेष सहभाग होता. उपस्थित सर्व माजी सैनिकांचा या प्रसंगी सन्मान करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या पदयात्रेची सुरुवात जेऊर बसस्थानकापासून झाली व जेऊर बाजारतळापर्यंत देशभक्तीपर घोषणा देत आणि तिरंग्याची शान उंचावत यात्रा पार पडली. या प्रवासात माजी सैनिक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे जेऊरमधील सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी पुष्पवर्षाव करून पदयात्रेचे स्वागत केले. देशभक्तीचा उत्साह आणि ऐक्याचा संदेश संपूर्ण गावात पसरला. या कार्यक्रमाला दिग्विजय बागल, रामदास झोळ, धनंजय डोंगरे, सूर्यकांत पाटील यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. संपूर्ण नियोजन सचिन पिसाळ, शुभम बंडगर व रविकिरण माळवे यांनी प्रभावीपणे केले.
