पारेवाडी येथील उपसरपंचाला मारहाण; सोन्याची अंगठी लंपास..

करमाळा : पारेवाडी (ता. करमाळा) येथे गावातील स्वच्छता मोहिमेदरम्यान उपसरपंच गणेश नवनाथ खोटे यांच्यावर चौघांनी हल्ला करून दमदाटी केली तसेच ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी हिसकावल्याची घटना घडली आहे.

गणेश खोटे (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोकुळ अष्टमी निमित्त धार्मिक कार्यक्रमापूर्वी ते जेसीबीच्या साहाय्याने रस्ते व सार्वजनिक ठिकाणांवरील काटेरी झाडे काढण्याचे काम करत होते. मारुती मंदिराजवळ ग्रामपंचायतीच्या जागेवरील झाडे हटवताना राहुल गोविंद टोणपे, राजेंद्र गोविंद टोणपे, पल्लवी राहुल टोणपे व हिराबाई राजेंद्र टोणपे (सर्व रा. पारेवाडी) यांनी “ही जागा आमची आहे” असे सांगत काम रोखले.

दरम्यान, चौघांनी शिवीगाळ व धमकी दिली. वाद वाढल्याने राहुल टोणपे यांनी खोटे यांना तर राजेंद्र टोणपे यांनी पांडुरंग नवले यांना मारहाण केली. याच वेळी राहुल टोणपे यांनी खोटे यांच्या उजव्या हातातील अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) काढून घेतली. अंगठी परत देण्याचे आश्वासन देऊनही ती अद्याप न दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

