जेऊर मार्केटयार्डात कर्जाच्या वादातून युवकाला मारहाण..

करमाळा : कर्जाच्या पैशाच्या वादातून जेऊर मार्केटयार्ड परिसरात एका युवकाला लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करण्याची घटना घडली. या प्रकरणी करमाळा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, सुरज भागवत माने (वय 27, रा. लव्हे रोड, जेऊर) यांनी दीड वर्षांपूर्वी उपचारासाठी नातेवाईक किरण दत्तु माने याच्याकडून 15 हजार रुपये उसने घेतले होते. 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिखलठाण चौकात उभे असताना किरण माने आणि तुषार हजारे हे मोटारसायकलवर येऊन त्यांना ‘मार्केटयार्डला चल’ म्हणत तिकडे घेऊन गेले.

तेथे किरण माने याने पैसे परत देण्याची मागणी केली. पैसे सध्या देणे शक्य नसल्याचे सांगताच, त्याने लाकडी दांडक्याने पाठीवर व हातावर मारहाण केली, तर तुषार हजारे याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, दीपक माने यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी पळून गेले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
