करमाळा तालुक्यात पाच महिला बेपत्ता : नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्यात 10 ते 15 ऑगस्ट या पाच दिवसांच्या कालावधीत तब्बल पाच महिला बेपत्ता झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये एक 18 वर्षीय तरुणीपासून ते 60 वर्षीय वृद्धेपर्यंत महिलांचा समावेश आहे. महिलांच्या वाढत्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

11 ऑगस्ट रोजी केम येथील 35 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने करमाळा पोलिसांत दाखल केली आहे. तर पिंपळवाडी येथील 18 वर्षीय युवती 12 ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडून परत न आल्याने तिच्या वडिलांनी तक्रार नोंदवली आहे.

तसेच, वीट येथील 33 वर्षीय तरुणी 14 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेल्याने तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. 16 ऑगस्ट रोजी करमाळा शहरातील 24 वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता झाली असून तिच्या हरवल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. याशिवाय, कोर्टी येथील 60 वर्षीय वृद्ध महिला हरवल्याची तक्रार करमाळा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

अल्पवयीन मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंतच्या बेपत्ता होण्याच्या घटनांची वाढती मालिका लक्षवेधी ठरत असून या घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

