गणेशोत्सव नियोजनासाठी करमाळा पोलिसांची उद्या बैठक – गणेश मंडळांची संपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

करमाळा (प्रतिनिधी) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळांसाठी दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व मंडळांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे.

अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितले की, तालुक्यात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस करमाळा तालुक्यातील सर्व गावांचे पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहावेत. गणेश मंडळाचे पदाधिकारी येताना मंडळाचे नाव, अध्यक्षाचे नाव, मोबाईल क्रमांक आणि मिरवणुकीचा दिनांक अशी आवश्यक माहिती घेऊन याव्यात.




