पांगरे येथे कृषी मेळावा व मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

करमाळा : करमाळा तालुक्यातील पांगरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगावच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी मेळावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

या मेळाव्यात शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर, पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या पिकांचे महत्त्व आदी विषयांवर तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती यंत्रसामग्री, नवीन पिकांच्या जाती व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी अभिषेक भुजबळ, अजय डोके, सत्यम ढोकणे, रवींद्र दराडे, विशाल बर्फे आदी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, आव्हाने व गरजा जाणून घेतल्या.

मेळाव्यात लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक गजेंद्र पोळ यांनी गटशेतीचे महत्त्व अधोरेखित केले तर लोकविकास डेअरीचे दीपक देशमुख यांनी शेती पूरक व्यवसायाचे शेतकऱ्यांच्या अर्थकारणातील योगदान स्पष्ट केले. यावेळी आरोग्य निरीक्षक ए.बी. तोडकरी यांनी साथीच्या आजारांबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ग्रामस्थांनी मोठा लाभ घेतला.

कार्यक्रमाला ॲड. दत्तात्रय सोनवणे, सहाय्यक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सरडे, वर्षा निकत, राजाभाऊ महाडिक, गणेश पारेकर, शितल घायाळ, सुरज भिस्ते, प्रा. सचिन आढाव, ज्ञानेश्वर गुटाळ, महेश टेकाळे, महेश शेळके, रामभाऊ बारकुंड, विशाल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

