सणासुदीच्या काळात मेनरोडवर तीन व चारचाकींना बंदी घालण्याची मागणी

करमाळा(दि.23): करमाळा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला रस्ता अरुंद असून वाढत्या वाहतुकीमुळे सतत कोंडी होत असते. याचा व्यापारी वर्ग व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून आगामी गणेशोत्सव व इतर सणासुदीच्या काळात या मार्गावरून तीनचाकी व चारचाकी वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी घालावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे तालुकाध्यक्ष प्रसाद जगताप यांनी करमाळा पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली आहे.

पोलीस निरीक्षक रणजित माने यांना प्रत्यक्ष भेटून हे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना करमाळा बाजार समितीचे माजी संचालक संतोष वारे, प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रसाद जगताप, शहर अध्यक्ष सोहेल बागवान, किशोर नरारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.




