निसर्गाचे वरदान लाभलेल्या मांगी तलावा चे सौंदर्य हरवले काटेरी झुडपांच्या विळख्यात

मांगी (प्रवीण अवचर यांजकडून) : करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध मांगी तलाव यावर्षी ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो झाला असून, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यातून खळखळत वाहणारे पाणी निसर्गाचे मनोहारी दृश्य खुलवते आहे. या विलोभनीय देखाव्यासाठी करमाळ्यासह आजूबाजूच्या तालुक्यांतील अनेक पर्यटक आणि निसर्गप्रेमी मांगी तलावाला भेट देत आहेत.

मात्र या परिसरात पोहोचणे निसर्गप्रेमींसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. कारण, तलावाकडे येणाऱ्या डाव्या व उजव्या कॅनल पट्ट्यांवर प्रचंड प्रमाणात काटेरी झुडपे उगवलेली आहेत. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच तलावावर जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्यांच्या आजूबाजूलाही झुडपे वाढल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास होत आहे.

लोणावळा–खंडाळ्याच्या टेकड्यांपेक्षाही मांगी तलावावरील मावळत्या सूर्याचे ‘सनसेट’ दृश्य पर्यटकांना मोहून टाकणारे आहे. पण या निसर्गसौंदर्यावर काटेरी झुडपांचे सावट आल्याने पर्यटकांची नाराजी वाढली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने तलाव परिसराची स्वच्छता करावी तसेच कॅनल पट्टीवरील रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून पर्यटकांना त्रास होऊ नये, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी यांनी केली आहे.

आज सकाळी मी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच तलाव परिसराची स्वच्छता करण्यात येईल,” असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाले आहे – सुजित बागल,सदस्य, ग्रामपंचायत मांगी, ता. करमाळा


