प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते – न्यायाधीश घुगे

करमाळा : मांगी (ता. करमाळा): “प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते. मोठे होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन करमाळा येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष संजयकुमार घुगे यांनी केले. मांगी येथील प्रगती विद्यालयात तालुका विधी सेवा समिती व करमाळा वकील संघ यांच्या वतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

न्यायाधीश घुगे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना अन्याय सहन करू नये. कुठलाही अन्याय झाल्यास प्रथम पालकांना, त्यानंतर शिक्षकांना कळवावे. तसेच १८ वर्षांखालील मुलांना न्यायालयामार्फत मोफत वकील मिळतात. राज्यघटनेत दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून जिद्दीच्या जोरावर प्रगती साधावी.”
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर श्री. ए. के. शर्मा, करमाळा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. अलीम पठाण, वरिष्ठ सदस्य ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, ॲड. बलवंत राऊत ॲड. राहुल सावंत, ॲड. प्रशांत बागल, ॲड. अक्षय वीर, ॲड. विश्वजीत बागल, ॲड. बालाजी इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनुपमा देवकर, गावचे उपसरपंच श्री. नवनाथ बागल, पोलीस पाटील श्री. आकाश शिंदे श्री. राहुल बागल, श्री. शुभम बागल, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश श्री. शर्मा साहेब यांनी प्रेरणादायी विचार मांडले. ॲड. अक्षय वीर यांनी पॉस्को कायदा, ॲड. प्रशांत बागल यांनी वाहतूक कायदा, ॲड. राहुल सावंत यांनी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या विषयावर तर ॲड. डॉ. बी. टी. हिरडे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रास्ताविक ॲड. विश्वजीत बागल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक आर. पी. खराडे तर संयोजन कनिष्ठ लिपिक श्री. पी. डी. करपे व श्री. मेटकरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन ॲड. विक्रम चौरे यांनी मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुपमा देवकर यांनी सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने येथेच्छ स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रगती विद्यालय मांगीचे मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.



