पतसंस्थेतील महत्त्वाचे रजिस्टर गायब : सचिवाची पोलिसांत फिर्याद

करमाळा(संदेश प्रतिनिधी): शामलताई दिगंबर बागल ग्रामीण बिगरशेती सहकारी महिला पतसंस्था, देवीचामाळ, करमाळा येथील सचिव सुनिल गजानन पुराणीक (वय 67) यांनी संस्थेतील महत्त्वाची रजिस्टर व फाईल्स गायब झाल्याची फिर्याद करमाळा पोलिसात दिली आहे.

दि. 13 एप्रिल रोजी ठेवीदारांच्या तक्रारीनंतर तपासणीसाठी बी.सी. पवार (प्रथम अप्पर विशेष लेखा परीक्षक वर्ग-2, सोलापूर) हे संस्थेत आले होते. त्यावेळी त्यांनी विविध रजिस्टर व फाईल्सची मागणी केली. मात्र तपासणी दरम्यान सन 2016 ते 2022 अखेरचे रोजकिर्द, सन 2023-24 चे व्हावचर्स (जमा नावे) तसेच वार्षिक सभा रजिस्टर कार्यालयातून गायब असल्याचे उघड झाले.

याबाबत सचिव पुराणीक यांनी संस्थेतील मॅनेजर अभिमन्यू महादेव गंधे आणि कॅशिअर राजेंद्र मोहन फलफले या दोघांकडे चौकशी केली. पण त्यांनी संबंधित रजिस्टर अथवा रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे या दोघांनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी संस्थेचे रजिस्टर व फाईल्स चोरी केल्याचा संशय व्यक्त करून सचिव पुराणीक यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास सुरु आहे.



